Nashik Kumbh Mela : ध्वजारोहणाने नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Nashik Kumbh Mela
Share on Social Sites

Kumbh Mela Nashik : अवघ्या कधी दिवसांवर येऊन ठेवपलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पर्वाचा उद्या, शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने शुभारंभ होणार आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील रामतीर्थ येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी मुख्य ध्वजारोहण होणार असून, त्र्यंबकेश्वरमध्येही याच मुहूर्तावर स्वतंत्र ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या तयारीला औपचारिक सुरुवात होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचा उद्या मंगलारंभ

दर बारा वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. देशभरातील साधू-महंत, आखाडे आणि लाखो भाविक या पर्वाशी जोडलेले असतात. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून कुंभपर्वाच्या धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दि. ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Governor Jishnu Dev Varma), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy Chief Minister Sunetra Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिकच्या रामतीर्थावर दुपारी १२.०२ वाजता ध्वजारोहण

See also  Drishyam 3 Review Marathi : ‘दृश्यम 3’ पाहावा की नाही? पहिल्या दिवशी केली एवढी कमाई ; क्लायमॅक्सही चर्चेत

नाशिकमधील रामतीर्थ येथे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पार पडणार आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते हा विधी होईल. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, वैष्णव आखाड्यांचे साधू-महंत आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी संकल्प, गणेशपूजन, पंचार्घ्य समर्पण आणि तीर्थपूजन असे धार्मिक विधी होणार आहेत. ध्वजारोहणानंतर गोदाआरती आणि प्रार्थना होणार आहे. त्यामुळे रामतीर्थ परिसरात धार्मिक कार्यक्रमांची तयारी करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वरमध्येही स्वतंत्र ध्वजपूजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या सोहळ्याचा महत्त्वाचा भाग त्र्यंबकेश्वर येथेही पार पडणार आहे. सकाळच्या वृत्तानुसार, त्र्यंबकेश्वर येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत शृंगेरी मठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती (Shankaracharya Vidhushekhara Bharati) यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Kumbh Mela Minister Girish Mahajan) यांच्यासह शैव आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. कुशावर्त तीर्थ येथे दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी ध्वजस्तंभ पूजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे नमूद आहे. त्यामुळे रामतीर्थ, त्र्यंबकेश्वर आणि कुशावर्त तीर्थ येथील कार्यक्रमांचे ठिकाण व वेळ लक्षात घेऊन भाविकांनी अधिकृत कार्यक्रमपत्रिकेनुसार नियोजन करणे आवश्यक आहे.

See also  Gold Rate Today : सोन्याचा घसरणीचा ट्रेंड सुरूच! जाणून घ्या नवे दर

गोदाआरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ध्वजारोहणानंतर गोदावरी नदीच्या काठावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी रामतीर्थ येथे जनजातीय बांधवांच्या सहभागातून विशेष गोदापूजन आणि महाआरती होणार आहे. या उपक्रमात सुमारे ६ हजार ५०० वनवासी बांधव सहभागी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महागोदाआरती होणार आहे. या सोहळ्यात महिला पुरोहितही गोदावरी मातेच्या पूजनविधीचे पौरोहित्य करणार आहेत. धार्मिक विधींचे निवेदन, पूजनाचे मार्गदर्शन आणि महाआरतीचे नेतृत्व अशा जबाबदाऱ्या महिला पार पाडणार असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे त्र्यंबकनगरीला छावणीचे स्वरूप

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दि. २९ ऑक्टोबरपासूनच शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रमुख मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुशावर्त तीर्थ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा नुकताच आढावा घेतला आहे. मान्यवरांच्या दौऱ्यामुळे प्रमुख मार्गावरील दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आणि आठवडे बाजार न भरण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आले आहे.

See also  भावांनो तयारीला लागा! राज्यात 7 हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती; तपशील घ्या जाणून

दोन्ही तीर्थक्षेत्रांमध्ये होणारे ध्वजारोहणाचे कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत. उद्याच्या सोहळ्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाकडे देशभरातील भाविकांचे लक्ष आहे.


Share on Social Sites