नवी दिल्ली: सीमांकन (Delimitation) म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना — लोकसंख्येनुसार प्रत्येक राज्याला किती जागा मिळतील आणि प्रत्येक मतदारसंघाची सीमा कुठपर्यंत असेल, हे नव्याने ठरवणे. सोमवारी, ३० नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयके मांडणार आहे.
या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढतील आणि महाराष्ट्राच्या जागा ४८ वरून ७२ होतील. या विषयावर देशभर चर्चा सुरू असली, तरी सीमांकन म्हणजे काय आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार, हे अनेकांना कळलेले नाही.
सीमांकन म्हणजे काय? (What is Delimitation)
सीमांकनाची दोन कामे असतात – राज्याला किती जागा मिळतील हे ठरवणे आणि प्रत्येक मतदारसंघाची सीमा आखणे. याच प्रक्रियेत अनुसूचित जाती-जमातींच्या राखीव जागाही नव्याने ठरतात. यामागचा हेतू साधा आहे – ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’. प्रत्येक खासदारामागे सारखीच लोकसंख्या असावी, जेणेकरून कोणाचेही मत दुसऱ्यापेक्षा जड किंवा हलके ठरू नये. पण गेल्या ५० वर्षांत लोकसंख्या बदलली आणि सीमा तशाच राहिल्या, त्यामुळे ही समानता आता राहिलेली नाही.
सीमांकनाची प्रक्रिया कशी असते? (How Delimitation Works)
सीमांकनाचे काम एका स्वतंत्र आयोगाकडे असते — मतदारसंघ पुनर्रचना आयोग (Delimitation Commission). हा आयोग अर्ध-न्यायिक संस्था असून त्याचे निर्णय अंतिम असतात; त्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि संसदही त्यात बदल करू शकत नाही. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात; मुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त त्यांचे सहकारी असतात. प्रत्येक राज्यातून पाच खासदार आणि पाच आमदार ‘सहयोगी सदस्य’ म्हणून असतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. आयोग मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करतो, जनतेचे आक्षेप-सूचना आणि जाहीर सुनावण्यांनंतर अंतिम आदेश देतो. त्यानंतर पुढची निवडणूक नव्या मतदारसंघांनुसार होते.
जागा ५० वर्षे का गोठवल्या होत्या?
आयोग आतापर्यंत चार वेळा नेमला गेला – १९५२, १९६३, १९७३ आणि २००२ मध्ये; शेवटची संपूर्ण पुनर्रचना १९७३ मध्ये १९७१ च्या जनगणनेवर झाली. त्यानंतर १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने जागांची संख्या गोठवण्यात आली आणि २००१ मध्ये ८४ व्या दुरुस्तीने ही बंदी २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत वाढवली. यामागे लोकसंख्या नियंत्रणाचा हेतू होता _ कुटुंब नियोजनात यशस्वी राज्यांना जागा कमी होण्याची शिक्षा होऊ नये. २००२ च्या आयोगाला फक्त राज्यांतर्गत सीमा आखता येत होत्या; त्यामुळे लोकसभेच्या जागा १९७६ पासून ५४३ वरच आहेत. २०२७ ची जनगणना ही बंदी संपवेल.
नव्या विधेयकात काय आहे?
सरकार ३० नोव्हेंबरला तीन विधेयके मांडणार आहे – राज्यघटनेची १३२ वी दुरुस्ती, मतदारसंघ पुनर्रचना (दुसरे) विधेयक २०२६ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) दुसरे विधेयक. या प्रस्तावानुसार लोकसभेची कमाल संख्या ५५० वरून ८५० पर्यंत वाढेल (राज्यांसाठी ८१५, केंद्रशासित प्रदेशांसाठी ३५) आणि विधानसभांची कमाल संख्या ६५० पर्यंत जाईल. प्रत्येक राज्याच्या जागा ५० टक्क्यांनी वाढतील – उत्तर प्रदेश ८० वरून १२०, महाराष्ट्र ४८ वरून ७२, तमिळनाडू ३९ वरून ५९, बिहार ४० वरून ६०, पश्चिम बंगाल ४२ वरून ६३ आणि केरळ २० वरून ३०. सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढत असल्याने कोणाचाही वाटा फारसा बदलत नाही – महाराष्ट्राचा वाटा ८.८४ टक्क्यांवरून ८.८२ टक्के होतो; १९७१ वरील प्रमाण २०५१ पर्यंत कायम राहील. सीमा २०११ च्या जनगणनेनुसार आखल्या जातील; आयोग २०२७ ची जनगणना पूर्ण होण्याआधीच काम सुरू करू शकेल.
वाद नेमकं कशावरून?
दक्षिणेकडील राज्यांना भीती होती की, केवळ लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटल्यास त्यांचा वाटा घटेल – जुन्या सूत्रानुसार तमिळनाडूच्या जागा ३९ वरून ३२ होऊ शकत होत्या. एप्रिल २०२६ मध्ये सरकारचे विधेयक याच कारणाने पडले. आता सर्व राज्यांच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवून आणि प्रमाण २५ वर्षे गोठवून हा आक्षेप दूर केला आहे. द्रमुकनेही पाठिंबा दिला – विधेयक नाकारल्यास २०२७ च्या जनगणनेवर तमिळनाडूच्या जागा ३१ पर्यंत खाली येऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही पाठिंबा जाहीर केला, मात्र पक्षात मतभेद आहेत. काँग्रेसने याला ‘गॅरिमँडरिंग’ म्हटले असून ताजी जनगणना न करता पुनर्रचना का, असा सवाल केला आहे.
महिला आरक्षणाशी काय संबंध?
महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये मंजूर झाला, पण त्याची अंमलबजावणी पुनर्रचनेशी जोडली आहे. २०२९ च्या निवडणुकीपासून लोकसभेत आणि विधानसभांत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव राहतील – आरक्षण १५ वर्षे राहील, जागा फिरत्या पद्धतीने बदलतील. कोणत्या जागा राखीव असतील, हे पुनर्रचनेनंतरच ठरेल.
महाराष्ट्रासाठी याचा अर्थ काय?
महाराष्ट्राच्या ४८ जागा ७२ होणार – उत्तर प्रदेशानंतरची सर्वांत मोठी वाढ, पण राज्याचा लोकसभेतील वाटा जवळपास तसाच राहतो. विधानसभेच्या जागाही ५० टक्क्यांनी वाढण्याचा प्रस्ताव आहे; याच सूत्राने महाराष्ट्राच्या २८८ जागा ४३२ होऊ शकतात, पण विधानसभानिहाय अधिकृत आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत. मतदारासाठी याचा अर्थ – तुमच्या मतदारसंघाची सीमा बदलू शकते, काही जागा राखीव होऊ शकतात आणि प्रत्येक खासदारामागची लोकसंख्या कमी होईल.
बहुमताचा आकडा आणि पुढे काय?
घटनादुरुस्तीसाठी लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत लागते. एप्रिलमध्ये सरकारला ३५२ मतांची गरज असताना फक्त २९८ मते मिळाली होती. आता आघाडीकडे सुमारे ३१९ सदस्य आहेत; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ८ आणि द्रमुकचे २२ मिळून हा आकडा ३५० पर्यंत जातो – म्हणजे सुमारे १० मते कमी. वायएसआर काँग्रेसचे ४ आणि छोट्या पक्षांची मते ही तूट भरतील, अशी अपेक्षा आहे. लोकसभा ३० नोव्हेंबर-१ डिसेंबर, राज्यसभा २-३ डिसेंबरला भरणार आहे. विधेयके मंजूर झाली, तर आयोग लगेच नेमला जाईल. नव्या मतदारसंघांनुसार पहिली निवडणूक २०२९ ची लोकसभा निवडणूक ठरण्याची शक्यता आहे.
विधेयकांचा मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नाही; वर दिलेले आकडे प्रस्तावातील सूत्रावर आधारित आहेत, अंतिम आकडे आयोगाच्या आदेशानंतरच ठरतील. मात्र, ५० वर्षांनंतर होणारी ही पुनर्रचना भारताच्या निवडणूक नकाशात मोठा बदल घडवणार आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

Nashik Kumbh mela : महागोदाआरतीने न्हाऊन निघाला गोदातीर; राष्ट्रपतींच्या हस्ते स...

Ladki Bahin Yojana : यादी तयार! 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे परत द्यावे लागणार ; या...

DRI कारवाई! Social Media वरून ‘या’ गोष्टींची तस्करी, उलगडा पाहून अधिकारीही थक्क

