आजच्या डिजिटल युगात Instagram Reels, YouTube Shorts यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही मिनिटे घालवण्यासाठी मोबाईल फोन हातात घेतला की, बराच वेळ स्क्रोलिंगमध्ये कसा निघून जातो हे युजरला कळत नाही. मात्र ही केवळ सवय आहे की, त्यामागे व्यसनासारखा पॅटर्न तयार होतो, याचा अभ्यास संशोधकांनी नुकताच केला आहे.
2025 मध्ये प्रकाशित झालेल्या “Can’t Stop Scrolling” या संशोधनात Tsinghua University आणि National University of Defense Technology मधील संशोधकांनी शॉर्ट-व्हिडिओ वापराचा सखोल अभ्यास केला. संशोधनासाठी मानसशास्त्रीय प्रश्नावली, मुलाखती आणि प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवरील 1.3 अब्जांहून अधिक user-video interactions यांचा वापर करण्यात आला. त्यातून 10 हजार 111 युजर्सचे व्यसनाशी संबंधित वर्गीकरण करण्यात आले.
संशोधनात असे आढळले की, शॉर्ट व्हिडिओचे व्यसन असलेल्या युजर्समध्ये दररोजचा पाहण्याचा कालावधी अधिक होता. विशेषतः रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण लक्षणीय दिसून आले. मात्र केवळ वारंवार अॅप उघडणे हे व्यसनाचे निश्चित लक्षण नसल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले.
वयोगटाचाही संबंध दिसून आला. 13 ते 24 वर्षे वयोगटात व्यसनाशी संबंधित प्रमाण अधिक होते आणि त्यात 18 ते 24 वर्षे वयोगट सर्वाधिक दिसून आला. तसेच व्यसनाधीन युजर्स तुलनेने कमी प्रकारचे कंटेंट पाहत असल्याचे आढळले, ज्यामुळे ‘फिल्टर बबल’ filter bubble तयार होण्याची शक्यता संशोधकांनी मांडली आहे.
या सवयीवर नियंत्रण कसे मिळवायचे?
यावरून रील्स पूर्णपणे बंद करण्यापेक्षा वापरावर मर्यादा ठेवणे महत्त्वाचे ठरते. विशेषतः रात्रीचे स्क्रोलिंग कमी करणे, स्क्रीन-टाइम लिमिट वापरणे आणि फोनपासून नियमित ब्रेक घेणे उपयुक्त ठरू शकते.
