
मुंबई l Mumbai :
वाढते शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहे आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा (7-12 Utara) बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड (Property Card) सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) हा निर्णय घेतला आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी शेतजमीनच उरलेली नाही. अनेक शहरांतील शेतजमीन जवळपास संपली आहे. त्यामुळे या शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातबाऱ्यांचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर झाले असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सात बारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व शहरांतील सात बारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.