आपल्यापेक्षा वयाने तब्बल 20 वर्षांनी लहान असणार्या प्रियकर तरुणाने आपल्यासोबतच लग्न करावे म्हणून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्यास आत्महत्या करण्यास भाग पडणार्या महिलेसह दोघांवर आडगाव पोलिसांत (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेच्या छळाला कंटाळून संबंधित तरुणाने आरोपीच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Youth Hanging himself in Nashik) त्यानंतर संबधित महिलेने तरूणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, पोलीस तपासात सगळा प्रकार उघडकीस आल्याने महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, रमेश रवींद्र मोरे (25) (Ramesh Ravindra More) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव असून तो भुसावळ (Bhusaval) येथील रहिवासी आहे. कधीकाळी बसमध्ये परिचय झालेल्या रमेश आणि संबंधित 45 वर्षीय महिलेचे मागील एक वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.
मृत रमेश आरोपी महिलेच्याच घरी राहू लागला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेला चार मुले आहेत. असे असूनही आरोपी महिला 25 वर्षीय रमेशवर लग्नासाठी दबाव टाकत होती.
रमेश गावाकडे जाऊन अन्य कुणाशी लग्न करेन हा भयगंड महिलेला सारखा छळत होता. त्यामुळे ती रमेशला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती. आरोपी महिलेच्या छळाला कंटाळून अखेर रमेशने तिच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोपी महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी आपला मुलगा आणि अन्य एका तरुणाच्या मदतीने रमेशचा मृतदेह महामार्गावर टाकून दिला. तसेच रमेशचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
शवविच्छेदन अहवालामुळे मृत्यूचे गूढ उलगडले
शवविच्छेदन अहवालामुळे रमेशचा मृत्यूचे गूढ उलगडले. शवविच्छेदन अहवालात रमेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, रमेश हा भुसावळ येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृताच्या घरी जाऊन तपास केला असता तो ओझर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिचा मुलगा आणि मुलाच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.