नवी दिल्ली ।
संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी दुपारी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात चंदीगडचा एकांश ढुल याने उत्कृष्ट कामगिरी करत देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
यंदाच्या परीक्षेत पहिला क्रमांक अनुज अग्निहोत्री याने मिळवला. एकांश ढुल हा हरियाणातील प्रभावशाली भाजप नेते कृष्ण ढुल यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण शहरात आणि राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
UPSC ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यंदा एकूण 958 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जनरल प्रवर्गातील 317, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 104, ओबीसी प्रवर्गातील 306, एससी प्रवर्गातील 158 आणि एसटी प्रवर्गातील 73 उमेदवारांचा समावेश आहे.
चंदीगडमध्ये शिक्षण
एकांश ढुल याचे शालेय शिक्षण चंदीगडमध्ये झाले. त्याने दहावीची परीक्षा सेक्टर-27 मधील भवन विद्यालयातून उत्तीर्ण केली. त्यानंतर बारावीचे शिक्षण सेक्टर-26 मधील सेंट कबीर पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले.
पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला आणि तेथे श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए ऑनर्स पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने दिल्लीमध्ये राहून यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.
यापूर्वीही त्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवले होते. 2024 मध्ये त्याला 342 वी रँक मिळाली होती, तर 2025 मध्ये त्याने 295 वा क्रमांक मिळवला होता. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर यंदा त्याने देशात तिसरे स्थान मिळवत मोठे यश संपादन केले.