खान्देशातील धुळे शहरातील डॉक्टर आशिष पाटील (Dr. Ashish Patil) यांनी शेतकऱ्याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records) आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने (Asia Book of Records) त्यांना सन्मानित केले आहे. भारत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे. (1 Kg Kidney Stone operation successfully done by Dr. Ashish Patil Dhule record registered)
नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी (Patoli, Nandurbar) येथील पन्नास वर्षीय शेतकरी रमण चौरे (Raman Chaure) यांच्या मूत्राशयातून नारळ एवढ्या आकाराचा, सुमारे एक किलो वजनाचा मुतखडा शस्त्रक्रिया करून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात धुळे शहरातील डॉक्टर पाटील यांना यश आले. त्यांच्या या शस्त्रक्रियेची दखल इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
चौरे यांच्या मूत्राशयातून काढण्यात आलेल्या मुतखड्याचा आकार 12.5 बाय 12.75 सेंटिमीटर असून हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा मुतखडा असल्याचे डॉक्टर आशिष पाटील यांनी सांगितले आहे. हा खडा एवढा मोठा होता की, त्याला 20-25 मिनिटे बाहेर काढायला लागले, अशी माहितीही त्यांनी दिली. तर रुग्णाची परिस्थिती उत्तम आहे आणि लवकरच तो बरा होऊन घरी जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी सर्वात मोठा मुतखडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याचा विक्रम याआधी आशिष पाटील यांच्याच नावावर होता.
पाटील यांना आतापर्यंत दोन गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड (Guinness Book of Records), दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड (Limca Book of Records), दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Record) यासह 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मूत्ररोग चिकित्सालयातील (Urology) विविध संशोधकांचे पाच पेटंट मिळविणारे डॉक्टर आशिष पाटील भारतातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत.